संपर्क

Sunday, 16 August 2020

*रिमझिम आठवणी* - दिनेश दाभाडे

🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈

                   *रिमझिम आठवणी*
                  -दिनेश दाभाडे (कन्नड)


मागिल काही दिवसांपासुन सलग चालू असलेला पाऊस अन् आज रेनकोट असुनही संध्याकाळी पावसानी घेतलेली यथेच्छ गळाभेट तीन वर्षापूर्वीच्या *रिमझिम आठवणीं* च्या घाटात घेऊन गेली.अशा घाटात जिथे ध्यानी-मनी नसतांना कित्येक वर्षांचा मुक्काम करावा लागला,अशा घाटात जिथे कल्पनेच्या पलीकडचं निसर्ग सौदंर्य अनुभवलं,अशा घाटात जिथे प्रत्येक ऋतु आपला रूबाब दाखवण्यात दंग असतो,अशा घाटात जिथे भरभरून जगायला मिळालं,अशा घाटात जिथे आयुष्यातील कित्येक पाने रिमझिम पावसातील आठवणींनी सजली....असा माझी सुरूवातीची कर्मभुमी असलेला *कसारा घाट*.
माझी २००९ साली ठाणे जिल्ह्यातील कसारा घाटातील विहीगाव रेंज या शाळेत नियुक्ती झाली.सुरूवातीची तीन वर्ष कसारा येथे व नंतरची साडे पाच वर्ष इगतपूरी येथे राहण्याचा योग आला.दोन्हीही ठिकाणाहून माझा शाळेचा प्रवास १० कि.मी.चा होता.शाळा अगदी घाटात असल्याने या दिवसात घरापासून ते शाळेपर्यंत पाऊस नक्कीच भेट द्यायचा.काही विसरले तरी चालेल पण बाहेर पडावे ते छञी,रेनकोट सोबत घेऊनच.कसारा गाव डोंगरउतारावर वसलेले असल्याने गावातील गल्लीबोळातील पाणी नाल्यामधून ओढ्यांना मिळायला वेळ लागत नाही.चांगला पाऊस सुरू झाल्यावर डोंगरदऱ्यातुन वाहणाऱ्या झऱ्यांचा मुक्काम किमान चार महिने ठरलेलाच समजा.इथला धो-धो पडणारा पाऊस मुंबईच्या धरणक्षेत्राकडे वाहून जाताना पाहतांना जितका आनंद व्हायचा त्यापेक्षा जास्त  उन्हाळ्यात इथल्या लोकांची पाण्यासाठी होणारी दैना अधिक दुर्दैवी वाटायची.पावसाळ्यात कित्येकदा लोकलने प्रवास करायचा योग आला.पावसाला चिरून पुढे जाणाऱ्या लोकलमध्ये वाऱ्यासोबत अधून-मधून छेडणारे पावसाचे थेंब अजूनही आठवतात.
आठवणींच्या बाबतीत इगतपूरीही काही कमी नाही.आज आपल्याकडे चालू असलेली रिपरिप तिथल्या मानाने दहा टक्केच असावी.कितीही हुलकावणी देऊन घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला तरी तो आपला डाव साधायचाच.या दिवसात बाहेर गेला अन् कोरडा आला तर आश्चर्यच समजायच.एकदा घराबाहेर पडलं की सर्व कामं उरकुनच घरात यायचं म्हणजे पुनःपुन्हा पावसाच्या कचाटात सापडायला नको हे ठरलेलं असायचं.धुवाधार पाऊस सलग तीन-तीन चार-चार दिवस कित्येकदा इथे अनुभवला.इगतपुरीत रहायला पहिल्या मजल्यावार होतो.हाँलच्या दोन्ही खिडक्या मोठ्या असल्याने पावसाळ्यात कडकडीत बंद असायच्या.खिडक्यांमधून या दिवसात एकच गोष्ट आत यायची ती म्हणजे बाजूला असलेल्या शेतातील झाडांचा शिळ वाजवणारा आवाज जो रात्री अजूनच भयावह वाटायचा.पावसाळ्यात सुरूवातीच्या दिवसात घराला लागून असलेल्या शेतात भात लावणी करणारे शेतकरी चिखलातून बैलांना हाकतांना खऱ्या मेहनतीची जाणीव व्हायची.सततच्या पावसाने सर्व भिंती सादळलेल्या असायच्या.झोपायच्या गाद्या ओल्या होऊ नये म्हणून या दिवसात भिंतींपासून दूर घरात मध्यभागी टाकलेल्या असायच्या.घरात गरमी रहावी म्हणून घरमालकांनी एक कोळशा जळणाची शेगडी दिलेली होती तीच एकमेव चैनेची वस्तू जी तिकडे घरोघरी पहायला मिळते.एक मात्र नक्की की मी आणि सोबत राहणारे खवय्ये;आम्ही या दिवसात खायची-प्यायची मोठी चंगळ ठेवलेली असायची.तीन दिवस नाँनव्हेजचा बेत ठरलेलाच असायचा.बाहेरून आल्यावर गरमा गरम चहा पिऊन आत्मा तृप्त व्हायचा.असल्या थंड वातावणात अंगावर घेऊन पडलं की मनशांती लाभायची.
इगपुरीहून शाळेचा मार्ग अधिक सुखकर होता.हायवेने घाटणदेवी अन् तिथून दीर्घ उताराच्या रस्त्याने विहिगाव.या दिवसात घाटनदेवी मंदीराच्या आजूबाजूचा परिसर महाबळेश्वर,माथेरान पेक्षा कमी नक्कीच नाही.पावसाळ्यात व हिवाळ्यात या परिसरात दाट धुक्यांचा मुक्काम ठरलेलाच असतो.दिवसाही लाईट लावूनच गाड्यांना वाट काढावी लागते.कँमल व्हँली परिसर तर जाणाऱ्या-येणाऱ्या प्रत्येकाला भुरळ पडल्याशिवाय राहत नाही.घाटणदेवी मंदिरराच्या डाव्या बाजुला डोंगररांगामध्ये धबधब्यांनी अगदी थैमान घातलेले असते.मंदिरापासुन दीर्घ उतारावरून शाळेच्या मार्गावर गाडी न्युट्रलमध्ये साधारणा ३ कि.मी.अंतर सहज पार करायची,पावसाळ्यात मात्र हे धोक्याचे असायचे.मंदिर ते पुढे विहिगाव भागात अनेक जुन्या व नव्या चित्रपटांच्या शुटींग्स झालेल्या आहेत.
आपल्याकडे नसणारी कौलारू छपरांची घरे शाळेच्या गावात शंभर टक्के होती अन् शाळाही 
तशीच.शाळेचा परिसर तर या दिवसात स्वर्गाहून कमी नाही.शाळेच्या दरवाज्यात उभे राहिले तर छताहून पडाणाऱ्या जलधारा,तिन्ही बाजूंनी डोंगर,डोंगर उताराहून वाहणारे छोटे- छोटे ओढे,समोर भाताच्या शेत्या,वैतरणा नदीला मिळणारा मोठा ओढा,कसारा घाटातील रेल्वेमार्ग,रेल्वेमार्गाच्या बोगद्यातून धुक्यांमधून  धावणाऱ्या रेल्वे,त्याच्याच बाजूने असंख्य वाहने भिजत घेऊन जाणारा मुंबई-आग्रा महामार्ग डोळे भरून पाहण्याचा योग कित्येकदा आला.शाळेच्या व्हरांड्यातून दोन-तीन दिवसातून एकदा इंद्रधनुष्याचे दर्शन ठरलेलेच असायचे.इंद्रधनुष्य दिसला की एखादा विद्यार्थी धावत येऊन सांगायचा किंवा मला दिसला तर मीही सर्वांना आवर्जून दाखवायचो.ढगांचा वावर बऱ्याचदा शाळेच्या छतांवर असायचा.शाळा भरण्याच्या अन् शाळा सुटण्याची वेळी हा भिडू खो द्यायला आवर्जून तयार राहायचा.साधारण पाऊस यायच्या अर्धा तास पहिलेच अंदाज यायचा की आता सुट्टी नाही,हा येणार म्हणजे येणारच.इथे येणारा पाऊस ज्या वेगात यायचा त्याच वेगाने वैतरणा धरणाकडे वाहून जायचा अन् सोडून जायचा इथल्या लोकांसाठी दुष्काळ कळा.उन्हाळ्यात शाळेच्या गावात कित्येकदा  मुक्काम असायचा तेव्हा पाणी मिळावं म्हणून रात्री दोन दोन वाजता गावकरी गावाबाहेरील विहीरीतून पाणी आणतांना बघून मन सुन्न होऊन जायचं.
      आज आपल्याकडे मुक्काम ठोकून ज्या पावसाने भिंतीवर शेवाळं आणली ती तर तिकडे घरी अन् शाळेत भिंतीवर,छतावर,पायऱ्यांवर नित्याचीच असायची.अनेकदा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम
पावसातच पार पाडावा लागायचा.शाळेच्या जवळच असणारे मध्य वैतरणा धरण,अशोका धबधबा(अशोका पिक्चरमधील गाण्याची शुटींग या ठिकाणी झाली) अशी नयनरम्य ठिकाणे पावसाळ्यात पुनःपुन्हा पहायचा योग यायचा.कसारा घाटातील हिरवा शालू पांघरलेल्या त्या पाड्यामध्ये कित्येक वर्ष हा पावसाळा मायेची ऊब देऊन गेला,रिमझिम आठवणी देऊन गेला.

🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
              
           
                  
               "कँमल व्हँली"👇🏻
                      व  
     " शाळेतून दिसणारा इंद्रधनुष्य"👇🏻
  

30 comments:

  1. रिमझिम पावसातील...... रिमझिम आठवणी

    ReplyDelete
  2. खूप छान सरजी

    ReplyDelete
  3. Kya bat hai sir खरंच खूप छान आठवणी जाग्या झाल्या

    ReplyDelete
  4. अप्रतिम सरजी

    ReplyDelete
  5. सुंदर शब्दांकन दिनेश सर

    ReplyDelete
  6. भाऊ एखाद पुस्तकं लिहा.... खूप छान लेख लिहला... पुराणी यादे ताजा गयी....

    ReplyDelete
  7. छान शब्दांकन दिनेश

    ReplyDelete
  8. शेवटपर्यंत मनाला खेलऊन ठेवणार शब्दांकन

    ReplyDelete
  9. Kya bat hai sirji bahut khub

    ReplyDelete
  10. अप्रतिम शब्दांकन दिनेश. Keep it up.

    ReplyDelete
  11. सर्वाचे मनापासून आभार!!!!!

    ReplyDelete
  12. Nice work dinesh keep going 💐💐

    ReplyDelete
  13. nicely written with deep insights..!!

    ReplyDelete
  14. चला तर मग जाऊ या त्याच रिमझीमत्या पावसात

    ReplyDelete
  15. अतिशय सुंदर लेखन सरजी आम्हालाही तुम्ही कोकणाची आठवण करून दिली . धन्यवाद !
    असेच लेखन करत जा अभिनंदन !

    ReplyDelete
  16. अप्रतिम लेखन 🙏🤗☝️☝️ खूप सुंदर क्षणांच्या आठवणीत नेल्याबद्दल धन्यवाद सर🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐

    ReplyDelete
  17. भाऊ आपण तर लेखक झालात

    ReplyDelete
  18. खूपच छान मित्रा

    ReplyDelete
  19. ञ्यंबकेश्वर ची आठवण जागी झाली मिञा, खुपच छान शब्दात वर्णन केलंस.

    ReplyDelete

भेटत राहा.....

  🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝 या धावपळीच्या आयुष्यात 18 वर्षानंतर मित्रांना  भेटण्याचा काल योग आला.दिवसभर फक्त गप्पा मारल्यानंतरही * अजून वेळ हवा होता ...