अगदी अलगदपणे मुलांच्या मनात आपलं घर करतो तो शिक्षक.विद्यार्थी दशेत अनेक शिक्षक येतात-जातात पण स्वतःच अस्तित्व मान्य करायला लावून हजारो मनाच्या गाभाऱ्यात आपलं नाव गोंदवतो तो खरा शिक्षक.शिक्षण क्षेत्राची आवड म्हणून सेवाभावी वृत्तीने दाखल झालेले शिक्षक शोधून काढायला तसा जास्त वेळ लागणार नाही. तसा प्रत्येक शिक्षक आदरणीयच असतो पण विद्यार्थी दशेपासून आजपर्यंत बोटावर मोजण्याइतकेच शिक्षक आवर्जून आठवतात नव्हे आठवावेसे वाटतात.'शिक्षक कसा आसावा?' या प्रश्नाचे उत्तर ज्यांच्याकडे बोट दाखवून मिळू शकते असे काही माझ्या आयुष्यातील नजरेतुन माझ्या मनाच्या गाभाऱ्यात आपल्या विविध शैलींनी गोंदण करून गेलेले काही मान्यवर शिक्षक -
साने गुरूजी प्राथमिक विद्यालय कन्नड मधील आमचे *श्री.भगवान ठाकरे सर* मला आजही आठवतात ते त्यांच्या विज्ञानाच्या शिकवण्यामुळे, कडक शिस्तीमुळे,परिपाठातील,विविध कार्यक्रमातील त्यांच्या वत्कृत्व शैलीमुळे.सरांकडून मिळणारी आपुलकीची वागणूक प्रत्येकाला आपलंस करून जाते.जि.प.हायस्कुल कन्नडचे *श्री.फकिरराव दापके सर* आठवतात ते त्यांच्या मधुर वाणीने मराठी सारखा विषय शिकवून तृप्त झाल्यामुळे.त्यांच्या स्पष्टीकरणातील दाखले पाठ,कविता अगदी जिवंत करून जायचे.त्यांना ऐकणे सुखद पर्वणी असायची.
जि.प.हायस्कुलचे माझ्या आवडत्या विषयाचे चित्रकलेचे शिक्षक *श्री.बडग सर* आठवतात ते त्यांनी एलिमेंटरी, इंटरमिजिएटच्या तासिकांमधून माझ्या कलेच्या जिज्ञासेला लावलेल्या वळणामुळे.रविवारच्या दिवशी सरांनी शिस्तीत घेतलेल्या चित्रकलेच्या सराव तासिका नक्कीच आयुष्यात रंग भरून गेल्या.चित्रांसाठीच्या ज्या काही वाकड्या-तिकड्या रेघोट्या आज मारता येतात त्या सरांमुळेच असे म्हणायला हरकत नाही.
पुण्यातील मिनाताई ठाकरे डि.एड्. काँलेजच्या आम्हाला Psychology (मानसशास्त्र) शिकवणार्रा *श्रीमती पाठक मँडम* या आठवणीत राहण्याचे कारण म्हणजे त्यांचे शिकवणे. माझ्यासारख्या मराठी माध्यमातून आलेल्या विद्यार्थ्यांला psychology सारख्या नवीन विषयाची तेही English माध्यमातून गोडी लावण्याची ताकद मँडमांच्या शिकविण्यात होती.तेव्हा लागलेली मानसशास्त्राची गोडी आजही कायम आहे.
पुण्यातील कलासागर कला महाविद्यालयात शिकत असतांना *श्री.खंडाळे सर* हे माझे ए.टी.डी. चे शिक्षक.चित्रकलेचा प्रत्येक विषय बारकाईने शिकवणारे, प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे बारकावे दाखवणारे, छोट्या-छोट्या चुका आवर्जून सांगणारे आमचे खंडाळे सर.कलेच्या क्षेत्रात काम करतांना रात्र अन् दिवस एक करून पुढे जावे लागते असे सांगणारे खंडाळे सर काँलेज असो वा घरी फक्त अन् फक्त कलेचा ध्यास घेऊन जगत होते.मला आठवतं की काँलेजच्या सुरूवातीच्या काही दिवसातच सरांनी कांदा काढण्याचे प्रात्यक्षिक घेतले होते,त्यात सरांनी माझ्या अगदी बारीक चुक दुरूस्ती करून घेऊन हुबेहुब कांदा माझ्याकडून काढून घेतला होता.
यापुढील नोकरी लागल्यापासून माझे काही सहकारी शिक्षक ज्यांचा सहवास मला बरंच काही शिकवून गेला ,प्रेरणा देऊन गेला अशांची आठवण मला आज काढावीशी वाटते.
'Don't say no' ह्या वाक्याची मनात खोलवर रूजवणूक करण्याचे काम माझ्या पहिल्या खाजगी शाळेच्या (Prestige Public School,Pune )च्या मुख्याध्यापिका *श्रीमती भटनागर मँडम* यांनी केले.आयुष्याचं खरं सुञचं 'Don't Say No ' या तीन शब्दात असल्याचं मला प्रकर्शान जाणवलं.कुठलंही काम समोर आल्यास त्याला नाही म्हणायचं नाही त्याला पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचे.होवून होवून काय होईल ते काम चांगले होईल किंवा बिघडेल पण सुरूवातीलाच कामाला नाही न म्हणता, काम साध्य होण्यासाठी आपले सर्वोत्कृष्ट प्रयत्न करायचे.या सुञाचा वापर आजही वेळोवेळी करण्याचा प्रयत्न करीत असतो.
*श्री.संदिप मनोहर सर* माझे ठाणे जिल्ह्यातील कसारा केंद्रातील सहकारी. पुर्वी वस्तीशाळा शिक्षक असलेले पण कुठल्याही नियमित शिक्षकाला लाजवतील असे कला गुण सरांमध्ये भरलेले.उत्तम शिकवण्याबरोबरच चित्रकला, खेळ, संगित,कला,कार्यानुभवाचे भांडार म्हणजे संदिप सर. गावातील गणपती उत्सवाच्या सर्व सजावटीची जबाबदारी घेणारे हे सर्व गुणसंप्पन व्यक्तीमत्व.
जिथे जाईल तिथे विद्यार्थी,शाळा अन् गावात हमखास बदल घडवून आणणारा अवलीया माणूस म्हणजे *श्री.दत्ता देसले सर*. कसारा केंद्रातील हे व्यक्तीमत्व कामाचा गवगवा न करता शाळेत बदल घडवून आणायचे.शासनाच्या पैशाची वाट न पाहता स्वतःच्या खिशातुन शाळेचा कोपरान् कोपरा दुरूस्ती करून रंगवितांना या माणसाने शाळेच्या विद्यार्थ्यांपासुन गावातील प्रत्येकाच्या मनात कधीच घर करून घेतलेले असायचे.आपल्या शाळेचा परिसर आपल्याला घराच्या सारखा वाटायला हवा हा त्यांंचा अट्टाहास. सरांनी माळच्या शाळेतील शौचालये पंचतारांकीत ठिकाणी असतात तशीच बनवून घेतली होती.कसारा पंचक्रोशीत क्रिकेटर म्हणून प्रसिद्ध असलेले देसले सर या क्षेत्राविषयी निष्ठा असल्याने दरवर्षीच्या क्रिडास्पर्धांचा सर्व ट्राफिज व प्रमाणपत्राचा खर्च न चुकता स्वतः करतात.
आजपर्यंतच्या आयुष्यात अशा गोडवा भरणार्या शिक्षकांना पाहून असे वाटते की शिक्षक फक्त त्याच्या पेशाशी प्रामाणिक असला तरी तो हजारोंच्या आयुष्यात रंग भरून जातो.त्यालाही माहिती नसते की आपण कुणाला,किती आणि कसे पैलू पाडत आहोत, त्याच्यासाठी ती एक नैसर्गिक क्रिया होऊन जाते.असा शिक्षक जरी या बाबतीत अजाण असला तरी त्याने घडवलेला प्रत्येक लहानगा त्याची वेळोवेळी आठवण काढत असतो नव्हे तर तो त्या शिक्षकाला विसरूच शकत नाही.त्या शिक्षकांनी हिच आठवण कृतज्ञता समजावी अन् विद्यार्थ्यांनी ती व्यक्त करीत राहावी.असा योग येत राहिल्यास आपण भाग्यशाली आहोत समजा.
आपणही आपल्या आवर्जून आठवाव्याशा वाटणाऱ्या शिक्षकांची या शिक्षक दिनाच्या दिवशी जरूर आठवण काढा.ज्यांची यादी मोठी तो अधिक समृद्ध समजा.

ज्ञानाचा सागर गुरू
ReplyDeleteधन्यवाद !!!!
DeleteShikshakanch kam khup moth ahe karan te pidhi ghadvtat.🙏
ReplyDeleteनक्कीच
Deleteगुरुविना जीवन अपूर्णच... छान मांडणी दाभाडे सर👍👌
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखुपच सुंदर
ReplyDeleteधन्यवाद
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteExcellent
ReplyDeleteThaxxxxx
Deleteअप्रतिम
ReplyDeleteधन्यवाद
DeleteThis comment has been removed by the author.
DeleteKhup chaan sirji
ReplyDeleteखुपच छान
ReplyDelete